दुदैवी घटना : छतावरून खाली पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील तरूणी मध्यरात्री छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीला आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-२५) रा. खेडी खुर्द ता. जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावात अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी जेवण करून घराच्या गच्चीवर झोपला होता. बुधवारी १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता त्याची आजी गोपाबाई चौधरी ह्या नातवाला उठविण्यासाठी गेल्या असता. अंकुश हा छतावरून खाली पडल्याने मयत स्थितीत दिसून आला. नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड केली. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेवून एकच आक्रोश केला. नेमका छतावरून अंकुश कसा पडला हे कुणालाच समजले नाही. या घटनेबाबत जळगाव तालुकापोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत अंकुशच्या पश्चात आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content