जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पेठ परिसरातून दुचाकी चोरल्याप्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील दोन संशयितांना शिरसोलीतून मुद्देमालासह अटक करण्यात आले. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील भंगाळे हॉस्पिटल येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ टीई ७०१३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एमआयडीसी हद्दीतील शिरसोली रोडवर दोन अनोळखी व्यक्ती दुचाकी घेवून संशयितरित्या जात असल्याची माहिती पो.नि. विनायक लोकरे यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोहेकॉ जितेंद्र राठोड, निलेश भावसार, प्रकाश पवार, राजेंद्र ठाकरे यांनी संशयित आरोपी मनोज यशवंत जाधव (वय-२६) रा. प्रजापत नगर, जळगाव आणि सागर महारू सपकाळे (वय-३२) रा. शनिपेठ यांना दुचाकीसह अटक केली.
दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी भंगाळे हॉस्पिटलजवळून दुचाकी चोरी केल्याचे सांगितल्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीसात दुचाकी हरविल्याची नोंद असल्याचे समजले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.