जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत देविदास दशरथ पाटील (वय-५६, रा. ममुराबाद ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ घडली. तसेच या अपघातात धडक देणारे दुचाकीस्वार मयूर डिगंबर डांगे (वय-२३) व ऋषी आबा महाले (वय-२१, दोघ रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघ गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्याती ममुराबाद येथील देविदास पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते दाणाबाजारात हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास देविदास पाटील हे (एमएच १९ डीजे ३६०९) क्रमांकाच्या दुचाकीने ममुराबादकडे जात होते. तर मयूर डांगे व त्याचा मित्र ऋषी महाले हे (एमएच १९ डीएक्स ४१११) क्रमांकाच्या दुचाकीने ममुराबाद येथून हळीदाचा कार्यक्रम आटोपून जळगावडे भरधाव वेगाने येत होते. याचवेळी दोघ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील देविदास पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर धडक देणारे दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात देविदास पाटील यांचा मृत्यू झाल्याने दुचाकीस्वार दोघ तरुणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विलास शिंदे हे करीत आहे.