जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शतपावली करतांना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रौढाचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबविल्याची घटना मानराज पार्कजवळ घडली. जिल्हापेठ पोलिसांनी तपास चक्रे फिरवित लागलीच संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी (वय १९, रा. शिवकॉलनी, मूळ रा. साकेगाव ता. भुसावळ) याला शिवकॉलनीतून अटक केली असून त्याच्या दोघ साथीदारांचा शोध घेत आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
शहराती मानराज पार्कमधील दौप्रदी नगरात सुमित एकनाथ भामरे (वय ५७) हे वास्तव्यास असून ते जनता बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. बुधवारी १० जानेवारी रोजी रात्री जेवण केल्यानंतर भामरे हे फोनवर बोलत शतपावली करण्यासाठी निघाले. ॲक्सीस बँकेकडून ते शतपावली करीत असतांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन ट्रिपलसीट आलेल्या चोरट्यांनी भामरे यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यानंतर भामरे यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसात सुमित भामरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना संशयित हे त्याच परिसरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक मिरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हेड कॉन्सटेबल सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस कॉन्सटेबल अमित मराठे यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी याला रात्री ११ वाजता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल आणि दुचाकी हस्तगत केली आहे.