नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिली असून रात्री उशीरा याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. यात मॉल्ससह मुख्य बाजारपेठांमधील दुकानांना मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे.
केंद्र सरकारने रात्री उशीरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता कोरोनाचा हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांमधील दुकाने उघडता येणार आहे. या निर्णयानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी म्हणजेच आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. तथापि, बाजारपेठेतील दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि व्यापारी संकुलांमधील दुकाने उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती उघडण्यास मनाई असेल. तथापि, पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने मात्र उघडता येणार आहेत. तर करोना हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.
केंद्र सरकारने रात्री उशीरा हा आदेश काढला आहे. यावरून आता राज्य सरकार जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची परवानगी देतील असे मानले जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासन याबाबत नेमके काय स्पष्ट निर्देश देणार याचेच जळगाव जिल्ह्यातील दुकानदारांना पालन करावे लागणार असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००