दुकानदारास ग्राहकाकडून मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील यावल जीनिंग प्रेसींग सोसायटीच्या व्यापारी संकुलात आठ दिवसांपूर्वी विकत घेतलेली नाईट पँट फाटकी निघाल्याने ती बदलून देण्यास दुकानदाराने विरोध दर्शविल्याच्या कारणावरुन दुकानदारास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या परिधान कलेक्शनचे संचालक राहूल मधुकर बडगुजर ( वय २२) याचे डोक्यात तीन ते पाच संशयितांनी फावड्याच्या लाकडी दांडक्याने घाव घालून त्यास गंभीररित्या जखमी केले. त्यांचे बंधू चंद्रकांत बडगुजर यांना देखील मारहाण केल्याची घटना आज दुपारी साडेबाराला घडली. राहूल बडगुजर यांस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. राहूल बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या परिधान कलेक्शनमध्ये बसले असतांना दुपारी साडेबाराला समीर रशीद कच्छी हा आला व त्याने आठ दिवसांपूर्वी विकत घेतलेली नाईट पँट फाटकी असून ती बदलून देण्याची मागणी केली. मात्र राहूल बडगुजर याने कोणत्याही मालाची वॉरंटी कंपनीकडून मिळत नसते म्हणून पँट बदलून देण्यास असमर्थता दर्शविली. त्याचा राग येऊन समीर कच्छी शिवीगाळ करून पँट दुकानातच टाकून संतापाच्या भरात निघून गेला. मात्र, लगेच थोड्या वेळाने समीर त्याचे वडील अब्दूल रशीद अब्दूल मजीत कच्छी व नातेवाईक यासीन जीकर कच्छी व इतर दोन जण दुकानात आले. समीर कच्छीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने राहूल यास डोक्यात घाव घालून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यातच दुकानात उभा असलेला त्यांचा भाऊ अक्षय उर्फ चंद्रकांत मधुकर बडगुजर ( वय २०) यांस देखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. दुकानातील सामानाची तोडफोड केली. खिश्यातील तीस हजार रुपये चोरीस गेले आहे. राहूल मधुकर बडगुजर याच्या फिर्यादीवरून संशयित समीर रशीद कच्छी, अब्दूल रशीद अब्दूल अजीत कच्छी, यासीन जीकर कच्छी, व अन्य दोन संशयित ( सर्व रा. डांगपूरा, यावल) यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लाकडी दांडके आणून फिर्यादी राहूल बडगुजर याच्या डोक्यावर जबरदस्त घाव घालून गंभीररित्या जखमी केले. त्यांचे बंधू अक्षय उर्फ चंद्रकांत मधुकर बडगुजर याचे गालावर मारून दुखापत केली असून संशयितांविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमल पठाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण व पोलिस हवालदार बालक बाऱ्हे हे करीत आहेत.

Protected Content