यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील महाराष्ट्राची चॅम्पियन व राष्ट्रीय पदक विजेती बॉक्सर दिशा विजय पाटील हिने गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत’ सुर्वणपदक पटकावले आहे.
१७ वर्षाखालील ६५ किलो वजनी गटातुन या स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. तर सोमवारी (ता.२०) पार पडलेल्या सामन्यात सेमीफायनलमध्ये तिने बंगालच्या मोनालिसा दास हिचा पराभव केला. आज सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात तिने हरियाणा येथील बॉक्सर रूद्रीका कुंदू हिला धुळ चारून सुर्वणपदकाची कमाई केली.
तिच्या या विजयामुळे किनगावसह यावल तालुक्यात व जळगाव शहरात जल्लोश करण्यात आला. दिशा ही पी.एन. लुंकड कन्या शाळेतील इयत्ता १० वीची विद्यार्थीनी तर निलेश बॉक्सिंग क्लब, जळगावची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक म्हणुन निलेश बाविस्कर, महाराष्ट्र बॉक्सींग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवडी, एकलव्य क्लबचे डॉ.श्रीकृष्ण आदींचे मार्गदर्शन लाभले. ती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय रमेश पाटील यांची कन्या आहे.
खेलो इंडिया खेलो स्पधेंत जिल्ह्याने केली दोन सुवर्णा पदकांसह चार पदकांची कमाई केली आहे. १६ जानेवारीपासून गुवाहाटी (आसाम) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया खेलो या स्पर्धेत जिल्ह्यातील वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी तीन पदके पटकावली आहेत. यात स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उदय महाजन (रजत पदक), सावदा येथील सूर्या व्यायाम शाळेचा विद्यार्थी प्रशांत कोळी याने जूनियर गटात (कास्य पदक), रवींद्र मराठे याने (सुवर्ण पदक) मिळवले आहे. किनगावच्या दिशा पाटीलने बॉक्सिंग स्पधेंत सुवर्ण पदक मिळवून जिल्ह्याला दोन सुवर्णासह चार पदके या स्पर्धेत मिळवून दिली आहेत.