मुंबई- आंध्र प्रदर्शने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आंध्रप्रदेशला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
श्री. देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला ‘दिशा’ कायदा प्रभावी ठरेल अशी माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष आंध्रप्रदेशला जाऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे.
या दौऱ्यात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) श्री. सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे हे सोबत असणार आहेत.