जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील आठवडे बाजारात कापड दुकान लावण्यासाठी जागा उपलब्ध देण्याच्या मागणीसाठी बोदवड येथील दिव्यांग बांधवाने सोमवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माणिक विश्वनाथ भिसे रा. बोदवड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते दिव्यांग असून त्यांचे आठवडे बाजारात कापड विक्रीचे दुकान आहे. कापड विक्री करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतात. कापड विक्रीसाठी त्यांच्याकडे दुकान नसल्यामुळे ते दर बुधवारी आठवडे बाजारातील कडू देवराम सुतार यांच्या दुकानासमोर त्यांचे दुकान लावतात. कडू सुतार हे शासकीय नोकरीला असल्या कारणामुळे त्यांनी त्यांचे दुकान व जागा बोदवड येथील सुभाष पांडू भोई यांना २ लाख रुपये घेवून भाडेतत्त्वावर दिलेला आहे. सुभाष भोई यांच्या दुकानासमोर माणिक भीसे हे त्यांचे कापड दुकान आठवडे बाजारात लावतात. परंतू सुभाष भोई याने दुकान लावण्यास मनाई केली आहे. यासाठी माणिक भिसे यांनी बोदवड नगरपंचायत प्रशासनाला भेट घेवून दुकान लावण्यास परवानगी मिळविली होती. यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी देखील मध्यस्थी केली होती. असे असतांना देखील दुकानदार सुभाष पांडू भोई याने दिव्यांग व्यक्ती माणिक भिसे यांना कापड दुकान लावण्यास मनाई केली. त्यामुळे बोदवड नगरपंचायत प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर भिसे यांनी सोमवारी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आपल्याला दर बुधवारच्या आठवडे बाजारात एका दिवसासाठी कापड दुकान लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असी मागणी दिव्यांग बांधव माणिक भिसे यांनी केली आहे.