दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द : पालकमंत्री

जळगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिव्यांगांना वैयक्तीक आणि व्यावसायीक आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. याचे निराकरण करून त्यांना देखील सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यांना विविध शासकीय योजनांना लाभ मिळवून देत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते दिव्यांग कल्याण आयुक्तालयातर्फे आयोजीत दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.

 

या कार्यक्रमाचे आयोजन ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय,  महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने जिल्ह्यातील दिव्यांगांना साहित्य वाटप करणेसाठी जिल्हा परीषद मार्फत ३० लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यानुसार सदर निधीतून जळगाव व धरणगाव तालुका व परीसरातील १०० दिव्यांग व्यक्तींना प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटप  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने   शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र सिंधी कॉलनी जळगाव येथे करण्यात आले. वाटप शिबीराचे आयोजन रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाजकल्याण विभाग जि.प. जळगाव यांच्या वतीने करण्यात आले.

 

राज्य शासनाच्या वतीने प्रथमच राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या साहित्यासाठी जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी ३० लक्ष निधी जिल्हा समाज कल्याण मार्फत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात उपलब्ध झाला होता. कार्यक्रमात पालकमंत्री महोदय यांनी आमदार निधीतून दिव्यांग साहित्य खरेदीसाठी आवश्यक तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आमदार निधीतून या पुढे दिव्यांनाना स्वयंचलित बॅटरी वर चालणार्‍या तीनचाकी सायकली देण्याचे आश्वासन देत दिव्यांगाना सर्वतोपरी मदत करण्याचे सूतोवाच केले.*

 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग विभागाचे प्रमुख भरत चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन विनोद बियाणी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन  अधिकारी जी. टी. महाजन, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी आदी  मान्यवर उपस्थित होते.

 

दिव्यांग बांधवांच्या वतीने मुकुंद गोसावी यांनी पालकमंत्री महोदय यांना वाढ दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मागण्या मांडल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्रीमती. उज्वला वर्मा तसेच आभार प्रदर्शन जी. टी. महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी दिव्यांग शाळेतील राहुल पाटील, श्याम सोनवणे, अक्षय महाजन, दिव्यांग संस्थेचे गणेश पाटील, जितेंद्र पाटील तसेच रेडक्रॉसचे योगेश सपकाळे, समाधान वाघ, बाबुलाल जैस्वाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Protected Content