नवी दिल्ली वृत्तसंस्था । विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच, राजकीय पक्षांशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण ६७२ उमेदवारांपैकी २० टक्के (१३३) उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
एडीआरच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे २५ टक्के उमेदवार आणि भाजपच्या २० टक्के उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याविरोधात गंभीर गुन्हे असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या १५ टक्के उमेदवारांनीही आपल्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं आहे. दरम्यान, ८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ६७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आपच्या ३६ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर भाजपच्या ६७ पैकी १७ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस तिसऱ्या, तर बसप चौथ्या स्थानी आहे. याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर आहे. २०१५ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ‘कलंकित’ उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यावेळी निवडणूक रिंगणात ६७३ उमेदवार होते. त्यातील ११४ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होते. या वेळी सर्वाधिक श्रीमंत तिनही उमेदवार आम आदमी पक्षाचे आहेत.