१७ बंधार्‍यांच्या कामांना ना. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव तालुक्यात सहा गावांमध्ये १७ सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. आज या बंधार्‍यांचे प्रत्येक गावात भूमिपुजन करण्यात आले असून पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून सिमेंट बांधाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.

राज्य सरकारच्या ध्येयधोरणानुसार जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणार्‍या कामांना आम्ही प्राधान्य दिले आहे. याचमुळे अलीकडच्या दोन वर्षात जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे. शेत रस्ते, सिंचन बंधारे, साठवण बंधारे, नाला बांध बंधारे आणि ट्रान्सफार्मर या कामांना प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात मागील महिन्यात साठवण बंधारे व नाला बांध बंधाऱ्यांसाठी सुमारे 30 कोटींचा निधी डीपीडिसी मार्फत मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले. ८० टक्के अनुदानावरील ठिबकच्या योजनेत जळगावचा समावेश करण्यात आलेला असून या माध्यमातून शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत विकास पोहचवला असून याचसाठी आम्ही थेट बांधावरच कार्यक्रम घेतला असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आलेल्या विटनेर, डोमगाव, बिलवाडी, जवखेडा, दापोरा आणि म्हसावद मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी ४८ लक्ष निधींचा तरतूद असलेल्या १७ सिमेंट बंधार्‍यांचे भूमिपुजन पार पडल्यानंतर ना. गुलाबराव पाटील बोलत होते. या बंधार्‍यांमुळे परिसरातील भूमिगत जलपातळीत वाढ होऊन शेतकर्‍यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन देखील ना. पाटील यांनी केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव तालुक्यात सहा गावांमध्ये १७ सिमेंट बांध मंजूर करण्यात आले आहेत. यात विटने, डोमगाव आणि बिलवाडी येथे प्रत्येकी ३; जवखेडा येथे ५, दापोरा येथे २ तर म्हसावद येथे १ अशा बंधार्‍यांचा समावेश असून यासाठी एकत्रीतपणे ४ कोटी ४८ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आज या बंधार्‍यांचे प्रत्येक गावात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते भूमिपुजन करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक गावात ना. गुलाबराव पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा ताल, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार जयघोषात प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून सिमेंट बांधाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला. यानंतर म्हसावद येथील शेतात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व पवन सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती जनार्दन पाटील,संगा.यो तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील ,  चंद्रशेखर पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, शासकीय समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष नंदलाल पाटील, आत्मा समितीचे तालुकाध्यक्ष पी.के. पाटील, रोजगार हमी योजना समितीचे तालुकाध्यक्ष रवी कापडणे, शिवसेना महिला आघाडीच्या मंगलाताई गोपाळ, शितल चिंचोरे, म्हसावदचे सरपंच संदीप पाटील, समाधान चिंचोरे, नगरसेवक गणेश सोनवणे, शिरसोली सरपंच अनिल पाटील, समाधान पाटील, हौसीलाल भोई, अर्जुन पाटील, बिलवाडीचे सरपंच डॉ. भरत पाटील, पाथरी  शिरीष चौधरी, साहेबराव पाटील, धैर्यसिंग पाटील, दिनेश पाटील, मोहाडीचे सरपंच धनराज (उर्फ डंपी ) सोनवणे, बबन पाटील, समाधान पाटील, मोतीआप्पा पाटील, भगवान पाटील,  राजेश राठोड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा संघटक नाना सोनवणे यांनी केले. यात त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी परिसरात विकासकामांचा जो झपाटा लावलाय त्याचा शेतकर्‍यांसह अन्य लोकांना लाभ होत असून आम्हाला याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, संगायो तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील व तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्र्यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे तोंड भरून कौतुक केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगताच्या प्रारंभी त्यांच्या प्रयत्नांनी परिसरात अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले की, सिंचन हा शेताचा आत्मा आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढले तर शेतकर्‍यांच्या आयुष्याचा कायापालट होत असतो. त्याचे जीवनमान उंचावत असते. यामुळे आम्ही सिंचनालाच प्राधान्य दिले आहे. मार्च महिन्यात आम्ही साठवण आणि अन्य बंधार्‍यांसाठी तब्बल ३० कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी प्रदान केली आहे. या सर्व बाबींमुळे जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढलेले आहे. शेतीसाठी आवश्यक असणारे शेत-पाणंद रस्ते, विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रान्सफार्मर्स, सिंचन बंधारे, साठवण बंधारे, नाला बांध बंधारे, शेत रस्ते या कामांना आम्ही प्राधान्य दिले आहे. या सर्व कामांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत आल्याचे प्रतिपादन देखील ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. तर म्हसावदसह परिसरातील जनतेसाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न असणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, या कार्यक्रमात परिसरातील सर्व सरपंचांनी भरीव कामे मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला. तर पालकमंत्र्यांच्या हस्ते वावडदा आणि लमांजन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत संचालकांना सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील यांनी तर आभार उपतालुका प्रमुख धोंडूभाऊ जगताप यांनी मानले.

Protected Content