दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी बैठका ; राऊत, पटेल, अजित पवार आणि जयंत पाटलांचीही हजेरी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकाचं सत्र सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही नुकतीच पवारांची भेट घेतली आहे

 

मुंबई पोलीस आयुक्तपदावर उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे.

 

दिल्लीतील पवारांचं निवासस्थान असलेल्या 6 जनपथवर शिवसेना खासदार संजय राऊत संध्याकाळी पोहोचले. त्यांनी पवारांसोबत साधारण 15 मिनिटे चर्चा केली. त्यावेळी राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा केल्याचं कळतंय. पवारांच्या भेटीसाठी जात असताना यावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. पवारांची भेट आटोपून राऊत निघाले त्यावेळीही त्यांनी या मुद्द्यावर मौन बाळगलं. राऊत यांची गाडी पवारांच्या निवासस्थानावरुन रवाना होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनीही माध्यमांशी बोलणं टाळलं.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्र्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. सिंग यांनी केलेल्या आरोपांची उच्चस्तरिय चौकशीची मागणी होत आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामाही मागितला जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गृहमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येतंय.

 

शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. अशावेळी काँग्रेसचीही मोठी बदनामी होत आहे. अशावेळी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी कमलनाथ यांनी पवारांच्या निवासस्थानही होत असलेल्या बैठकीला हजेरी लावल्याचं बोललं जात आहे.

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल. देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. अन्य नेत्यांशी बोलून देशमुखांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता देशमुख गृहमंत्रीपदावर कायम राहणार की त्यांची उचलबांगडी केली जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Protected Content