नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा कट हा पूर्वनियोजीत असल्याची माहिती एसआयटीच्या चौकशीतून समोर आली आहे.
नवी दिल्लीत उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता अशी माहिती एसआयटीच्या चौकशीतून समोर आली आहे.
पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे दिसून आले आहे. ज्या व्हिडिओमध्ये इकबाल सिंग दिसत आहे, त्यावरूनही तो जमावाला भडकावत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नाही, तर त्याच्या सोबत इतरही काही लोक उपस्तित होते. ते सर्व जण जमावाला भडकावण्याचेच काम करत होते.