दिल्लीतील शेतकरी आंदोलक राळेगणसिद्धीत

 

नगरः वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील ११ जणांचे शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे आले आहे. एरवी विविध आंदोलने करणारे हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कुंभकर्णासारखे झोपले असून त्यांना जागे करण्यासाठी आलो आहोत, असे या आंदोलकांनी सांगितले.

या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र, हजारे यांनी ऐकले नाही तर येथेच थाळीनाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी असलेले प्रकाश श्रीवास्तव व दीपक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पंजाब, हरियाणा, दिल्ली व बिहारमधील शेतकऱ्यांचा समावेश असलेले ११ जणांचे शिष्टमंडळ राळेगणसिद्धीला आले आहे. काल रात्रीच ते येथे येऊन दाखल झाले असून आज दुपारी ते राळेगणसिद्धीमध्ये जाणार आहेत. सुरवातीला त्यांना भेट नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर मात्र आज दुपारी हजारे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे कळविण्यात आले आहे. काल रात्री हे शिष्टमंडळ नगरमध्ये आले.

त्यांनी सांगितले की, हजारे यांना आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. सोबत पुष्पगुच्छ घेऊन जाणार आहोत. त्यांचा सत्कार करून निमंत्रण देणार आहोत. मात्र, जर आम्हाला त्यांना भेटू दिले नाही, तर तेथेच आंदोलन केले जाईल. एरवी हजारे यांनी विविध आंदोलने केली. त्यासाठी ते दिल्लीत आले. त्यांना आम्ही शेतकऱ्यांनीही साथ दिली. विविध टीव्ही कार्यक्रमांतही हजारे सहभागी होतात. मात्र, दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना हजारे तिकडे आले नाहीत. जास्त कष्ट नकोत केवळ शेतकऱ्यांसोबत त्यांनी दोन पावले चालले तरी शेतकऱ्यांना लढण्यासाठी बळ येईल. मात्र, हजारे यांना सत्ताधाऱ्यांची भीती वाटत असावी, असा आम्हाला संशय आहे. तेच विचारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्यांनी कुंभकर्णी झोप सोडून आमच्यासोबत मोकळपणाने यावे, नव्या कृषी कायद्याच्या संबंधी बोलावे, अशी आमची अपेक्षा आहे. ते आम्हाला पितासमान आहेत. आमची विनंती ते नक्की ऐकतील असा विश्वास आहे.

मात्र, त्यांची आणि आमची भेट घडवून आणली गेली नाही, तर त्यांच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, असेही या आंदोलकांनी सांगितले.
यासंबंधी राळेगणसिद्धी येथील कार्यालयात संपर्क साधला असता. दिल्लीच्या शेतकरी आंदोलकांचा भेटीसंबंधी निरोप आल्याचे सांगण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे म्हणने ऐकून घेण्यासाठी हजारे तयार असल्याचे असल्याचे सांगण्यात आले. आज दुपारी त्यांची भेट होणार आहे.

Protected Content