दिल्लीतही फटाक्यांवर बंदी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर फटाक्यांवर बंदी घालण्याचा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.

सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

दिल्लीमध्ये काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत दिवसाला सहा हजाराहून जास्त रुग्णांची नोंद झाली. आधी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दिवाळीत फटाके फोडू नका असं आवाहन केलं होतं.

Protected Content