दारूसाठी हॉटेल मालकाला मारहाण करून जबरी रोकड लांबविली

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील दहिवद चिंचगव्हाण फाट्यासमोर असलेल्या बियर बार हॉटेलमधील मालकाला रात्री दोन जणांनी दारूची मागणी करत मारहाण करत जबरी खिशातील २३ हजार रुपयाची रोकड व सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत मेहुनबारे पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव ते धुळे रोडवर असलेल्या दहिवद-चिंचगव्हाण फाट्यासमोर संजय नागराज पाटील (वय 48 रा. दहिवद ता. चाळीसगाव) यांचे कुणाल बियर बार नावाचे हॉटेल आहे. हॉटेल व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २६ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संजय पाटील हे हॉटेलमध्ये झोपलेले असताना त्या ठिकाणी भूषण प्रभाकर वाघ व अमृत वाल्मीक वाघ दोघे रा. दहिवद ता.चाळीसगाव हे दोघेजण येऊन त्यांनी दारूच्या नशेत येऊन हॉटेल मालक संजय पाटील यांना दारूची मागणी केली. परंतु संजय पाटील यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी संजय पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील २३ हजार रुपयांची रोकड व हातातील सोन्याची अंगठी जबरी काढून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण प्रभाकर वाघ आणि अमृत वाल्मिक वाघ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.

Protected Content