जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुणाकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले, परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या तोंडावर फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री बेंडाळे चौकात घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील काट्याफाईल परिसरात जयान शेख सलाउद्दीन हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच परिसरात राहणारा शहजाद खान सलिमखान उर्फ लल्ला हा दोन तीन दिवसांपासून त्याला त्रास देत होता. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जयान शेख हा काका खलील शेख यांच्यासोबत सुप्रिम कॉलनीत जाण्यासाठी निघाले. बेंडाळे चौकाकडून नेरीनाक्याकडे जात असतांना शहजाद खान उर्फ लल्ला हा त्याच्या दुचाकीवरुन येत जयान शेखच्या गाडीपुढे त्याची गाडी आडवी लावून हजार रुपयांची मागणी केली. परंतु तरुणाने त्याला माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगितल्याने शहजाद खान याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या हातातील फायटरने जयान शेखच्या तोंडावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत जयान शेखच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. त्याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित शहजाद खान सलिम खान उर्फ लल्ला याच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.