यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात भामट्याने ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्याची घटना यावल तालुक्यातील वढोदा येथे घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती की, सुरेश नामदेव चौधरी (वय-७०) रा. वढोदा ता. यावल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ११ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरेश चौधरी हे घरी असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासमोर आला. त्याने सांगितले की, “मी जुने दागिने पॉलिश करून देतो” त्यावर त्याने घरातील जुने वस्तू आणण्यास सांगितले. त्यानुसार सुरेश चौधरी यांनी घरातील पितळी तांब्या त्याच्याकडे दिला. त्याने लिक्विडने घासून चमकवून दाखविला. त्यानुसार त्यांच्यावर विश्वास बसल्याने त्याने “सोन्याचे दागिने असतील तर ते द्या मी चमकवून देतो’ असे सांगितले त्यानुसार सुरेश चौधरी यांचे पत्नी उज्वला चौधरी यांनी गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन काढून त्याच्या हातात दिली. त्याने डब्यात सोन्याची चैन टाकून हळद लावली नंतर डबा गॅसवर ठेवून तो गरम केला त्यानंतर त्याने “पाच मिनिटांनी डबा थंड झाल्यावर चेन काढून घ्या” असे सांगितले व तिथून निघून गेला दरम्यान पाच मिनिटानंतर त्याने डबा उघडून पाहिला असता त्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.