यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव व परिसरात वीज कंपनीकडून ग्राहकांना अवाजवी अव्वा की सव्वा विज बिल आल्याने ग्राहक महावितरण वीज कंपनीवर प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत.
दहीगाव, सावखेडा सिम, कोरपावली, महेलखेडी या गावांमधील ग्राहकांना वीज कंपनीकडून वीज बिलांची आकारणी मोठ्या प्रमाणात झाल्याने वीज बिले भरणे ग्राहकांना अवघड होत आहे. सर्वसामान्य नागरीक सध्या कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादुर्भावाने रोजगार व उत्पन्न अत्यल्प झालेले असल्याने हातावर पोट भरणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्यांना विज बिल भरणे हे जवळपास अशक्य झालेले आहे.
वाढीव बिले दुरुस्त करा
कोरोना महामारीपुर्वी विज ग्राहकांना पन्नास, शंभर ते दोनशे रुपये वीजबिल येणाऱ्यांना मागील ५ ते ६ महीन्यापासुन दोन ते तीन हजार रुपयेपर्यंत वीज बिल आलेले असल्याने यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.ग्राहकांना महावितरण वीज कंपनीने त्वरित हे पाठवलेले अवाजवी बिल दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त करीत आहे.
शासनाच्या उद्देशाला बसणार हरताळ
शासनाने अल्पभूधारक तथा मजुर वर्गांना मोफत वीज मीटर बसून दिलेले आहेत. वीज चोरीला आळा बसावा हा यामागील उद्देश होता आणि आहे. मात्र याच मीटरधारकांना वीज कंपनीने हजारो ने वीज बिले दिली असल्याने ग्राहकांना विजेचा धक्काच बसला असून परिसरात या वाढीव बिलाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे उर्जामंत्री यांनी ग्राहकांना कोरोना काळातील विजबिल माफी करण्याचा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाला मात्र चुकारा देण्यात आलेला असून राज्यातील नागरीकांचा भ्रमनिराश झाला आहे. आता महावितरण कंपनीच्या बिल वसुलीसाठी वीज कंपनीने हे आधीपासुनच आर्थिक संकटात सापडलेल्या ग्राहकांना सक्तीची विज बिल वसुलीसाठी वेठीस धरल्याचे बोलले जात असल्याने दहीगाव व परिसरातील गावातील ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहे.