दहावी-बारावीच्या निकालाबाबत अफवांवर विश्‍वास ठेवू नका- शिक्षण मंडळाचे आवाहन

धरणगाव प्रतिनिधी । दहावी बारावीच्या निकालाच्या वेगवेगळया तारखा सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत असून शिक्षण मंडळाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे वायरल होणार्‍या तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे व्हॉटसअप, फेसबुक व सोशल मिडीयावर परस्पर प्रसारीत होणार्‍या निकालाच्या वेगवेगळया तारखांवर विद्यार्थी व पालक यांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी व १० वीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाचे अधिकृत ईमेल, प्रसिध्दी माध्यम व वर्तमानपत्र यांमार्फत अथवा मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content