मुंबई प्रतिनिधी । दहावीचा भूगोलाचा बाकी असलेला पेपर रद्द करण्याचे संकेत मिळाले असून याबाबत मंगळवारी निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन् कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली असून सोमवारी (ता. १३) बोर्डाचे अधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला असून मंगळवारी (ता. १४) त्यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील १८ लाखांहून अधिक विद्यार्थी २०१९-२० मध्ये दहावीची परीक्षा देत असून पाच विषयांचे पेपर लॉकडाउनपूर्वी संपलेले आहेत.
आता भुगोल या विषयाचा पेपर घ्यायचा म्हटले तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण वर्गखोल्यात सॅनिटायझर तथा जंतूनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. तर सर्व विद्यार्थी व पर्यवेक्षकांना एन- ९५ मास्क द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या भितीने बहूतांश पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला पेपरला न पाठविण्याचाही निश्चय केला आहे. यातच आता राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. पुणे बोर्डापुढे निकालाचा पेच
राज्यातील १८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे पेपर दिले आहेत. आता भुगोलाचा पेपर राहिला असून विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर या पेपरच्या गुणाचा परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचाच लावायचा की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करुन भुगोल विषयाला गुण द्यायचे याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तर, पाच विषयांच्या उत्तरपत्रिका पडताळणी व फेरपडताळणीचे काम लॉकडाउन अन् संचारबंदीमुळे संथगतीने सुरु असल्याने निकालही लांबणीवर पडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००