मुंबई : वृत्तसंस्था । “मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झालं होतं. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? एकदा चंद्रकांत पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांनी फार आग्रह केला नाही. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का?,” असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. दुसरीकडे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपा अशी टीकाही जोरात सुरू आहे. खडसेंना राष्ट्रवादीत चॉकलेट मिळतं की, लिमलेटची गोळी? हे आम्हाला पण पाहायचं आहे, असा चिमटा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला होता. त्याला स्वतः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीच उत्तर दिलं आहे.
“अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे, जे गाडीभर नव्हतेच. ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला, त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटे अजित पवारांसोबत शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत आहेत,” अशी टीका खडसे यांनी केली.
“माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत, हे महत्वाचे नाही. किती लोक निवडून आणू शकतो, हे महत्वाचं आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र १०-१२ माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील,” असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी प्रवेश करण्याआधीपासूनच खडसे भाजपावर टीका करताना दिसत आहे. राष्ट्रवादी प्रवेश करताना आणि त्यानंतर खडसेंकडून केल्या जाणाऱ्या टीकेची धार वाढली आहे.