दरेकरांना अजित पवारांच्या कोपरखळ्या

 

मुंबई : वृत्तसंस्था । प्रवीण दरेकर यांचं  जाकिट बघून कोरोना जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं असंही काही झालं असेल तर माहीत नाही”, असं अजितदादा म्हणाले आणि विधानपरिषदेत दोन्ही बाजूकडून या कोटीला खळखळून दाद मिळाली.

 

राज्यात  बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय ठरला आहे.  याविषयी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात देखील उल्लेख केला होता. त्यावर बोलताना विधिमंडळाचं वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेमध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अजित पवारांची राजकीय टोलेबाजी पुन्हा ऐकायला मिळाली. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना करोना झाला नसल्याचं सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला!

 

राज्यातल्या परिस्थितीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला जावं देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार कोरोनाग्रस्त आहेत”. अजित पवार पुढे म्हणाले, “एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल.

 

 

“पण तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असं म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका”, असं म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं’ म्हणताच अजित पवारांनी “प्रसादने (भाजपा आमदार) मलाही जॅकेट दिलं होतं”, असं म्हणत सूचक इशारा केला आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला.

Protected Content