पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर कसबे येथील तडवी समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दफनासाठी जागा न मिळाल्याने त्याचा मृतदेह आणून थेट ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडण्याचा प्रकार येथे आज सायंकाळी घडला. या प्रकरणी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हकीम हबीब तडवी ( वय – ३५ रा.पहूर कसबे ) यांचे आज दि. २ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेची सायंकाळी पाच वाजेची वेळ होती. तडवी समाज पूर्वी पासून समाजाच्या असलेल्या जागेवर दफनविधी साठी गेले असता शेत मालकांनी दफनविधी करू देण्यास नकार दिला. त्यानंतर तडवी समाजाचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले असता सपोनी राकेशसिंह परदेशी यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तडवी समाजाच्या कार्यकर्त्यानी दफन भूमीपासून पहूर कसबे ग्राम पंचायती समोर मृतदेह आणून ठिय्या आंदोलन सुरु केले. काही जणांनी अंत्यविधिसाठी ग्रामपंचायती समोरच खड्डा खोदला. वाद वाढतच चालल्याचे पाहून सरपंच पती शंकर घोंगडे, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, ग्राम पंचायत सदस्य विवेक जाधव यांचेसह लोकप्रतिनिधी व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे आदींनी दफनभूमीसाठी कायम स्वरूपी पर्यायी जागा देण्याचे ठरविले. त्या नंतर जागेची पाहणी करण्यासाठी गेले असता यानंतर दफन भूमी म्हणून पर्यायी जागेचा उपयोग करण्यांचे ठरले. अखेर दिड तासानंतर मृतदेह त्या ठिकाणी नेऊन दफन करण्यात आले. एपीआय राकेश सिंह परदेशी व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, या प्रकारात बराच वेळ गोंधळ झाला. हे सारे घडत असतांना फिजीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडून मोठी गर्दी ग्रामपंचायतीच्या समोर जमली होती.