पालघर (वृत्तसंस्था) गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय शिंदे यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. परंतू आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाने मुलं चोरणारी टोळी समजून तीन जणांची पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. तर आज गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे ही माहिती दिली की, दत्तात्रेय शिंदे यांची पालघरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, दत्तात्रेय शिंदे यांनी या पूर्वी सिंधुदुर्ग सांगली आणि जळगाव येथे काम पाहिले आहे.