जळगाव, प्रतिनिधी : कोविड जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ चालला असून त्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने निवेदन दिले सरकार व प्रशासनाने दडपशाही मार्गाने भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर, गुन्हे दाखल केले. मात्र यामुळे विरोधक व जनतेचा आवाज दाबता येणार नाही असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिला.
जिल्हा पालकमंत्र्यांची हतबलता व कबुली, सत्ताधार्यांचे अपयश, अधिकाऱ्यांची मुजोरी, समन्वयाचा अभाव, राजकारण यामुळे शेकडो व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक मृत्युदर जळगाव जिल्ह्याचा असून त्यावर पांघरून घालण्यासाठी गुन्हे दाखल करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रकार आहे असे ही सूर्यवंशी म्हणाले. राज्याचे आरोग्य मंत्री मास्क न वापरता फिरले, ते बैठका घेत असतांना शौचालयात मृत देह पडून असणे,त्यांच्या भेटीसाठी त्यंच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंग पालन न करणे याविषयी अद्याप कोणतीही कार्यवाही अथवा गुन्हे दाखल करण्याची हिंमत प्रशासन का दाखवू शकले नाही. हे सर्व जनतेला माहित आहे. दुसरीकडे आपल्या व्यवसाय बंदी मुळे न्याय मागणाऱ्या नाभिक बांधवांवर कारवाही करणे, दररोज सकाळ-संध्याकाळ वेगवेगळे आदेशकाढूनव्यापाऱ्यांच्या दुकानांना सिल करणे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गोदावरी, शाहू महाराज, पुन्हा गोदावरी, कधी पूर्वीचे सिव्हील हॉस्पिटल असा खेळ खंडोबा मांडून गरीब व सामान्य जनतेचा जीव वेढीस धरून आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजविले असल्याचा आरोप हि दीपक सूर्यवंशी यांनी केला.कोरोनाच्या लढाईतील सर्व योद्धांबद्दल भाजपा कायम आदर व सन्मान व्यक्त करीत आहे. मात्र दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कामचुकार प्रवृत्ती व राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात भाजपा कायम संघर्ष करून सामान्य जनता व व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज बुलंद करेल तो दाबण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा ही महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिला आहे