जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरा बाहेर उभ्या असलेल्या चारचाकींचे काच दगडाने फोडून पळून जाणाऱ्या माथेफिरूचा उपद्रव पुन्हा सुरू झाला. शिवकॉलनीमध्ये ६ टवाळखोरांनी मोकळ्या जागेत उभ्या नवीन चारचाकी वाहनाच्या दगड मारून काचा फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात कार मालकाच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवकॉलनी येथे प्रदीप पंढरीनाथ राणे हे कुटूंबियांसह राहतात. डिसेंबर महिन्यात त्यांनी नवीन चारचाकी कार खरेदी केली. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची कार ही घराजवळील मोकळ्या जागेत उभी केली होती. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्यांना घराबाहेर मोठा आवाज आला. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांच्या कारजवळून काही मुले पळताना दिसून आले. संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एक दुचाकीस्वार तरूण इतर मुलांना इशारे करून काही तरी सांगताना होता. त्यानंतर इतर मुलांनी दगड उचलून कारला फेकून मारल्याचे दिसून आले. अखेर राणे यांनी कारची पाहणी केल्यावर त्यांना मागील काच फुटलेला तर पार्किंग कॅमेरा व डिक्कीचा लॉक तुटलेला आढळून आले. चौकशी केल्यावर त्या सहाही मुलांचे नाव सुध्दा समोर आले आहे. अखेर सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता राणे यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून कारचे दीड लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सहा मुलांविरूध्द तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.