हैदराबाद: : वृत्तसंस्था । सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ दक्षिण भारतात बनवलं जावं, अशी मागणी पुढे आली आहे. दक्षिण भारतातील ५ राज्यं अनुक्रमे तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या बार काऊन्सिल बेंचच्या मागणीसाठी एकत्र आल्या आहेत.
एका वेबिनारमध्ये या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणींमुळे न्यायासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकजण न्यायापासून वंचित राहतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं बेंच दक्षिण भारतात स्थापन करावं, अशी मागणी करण्यात आली आहे
तेलंगाणा बार काऊन्सिलतर्फे रविवारी एका वेबिनारमध्ये दक्षिण भारतात सुप्रीम कोर्टांचं बेंच स्थापन करण्याच्या मागणीवर चर्चा झाली. तेलंगाणा बार काऊन्सिलचे चेअरमन ए. नरसिम्हा रेड्डी यांच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीचं नेतृत्व नरसिम्हा रेड्डी करणार आहेत. या समितीतर्फे दक्षिण भारतात सुप्रीम कोर्टाचं बेंच स्थापन करण्याबाबत प्रयत्न केले जातील.
सुप्रीम कोर्टाचे चार बेंच देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आलेली आहे. मात्र, पहिल्यांदाचं सुप्रीम कोर्टाचं बेंच स्थापन करण्याची मागणी वकिलांच्या संघटनांकडून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट चार ठिकाणी बेंच स्थापन करण्याबाबत निर्णय का घेत नाही, हे समजत नाही. असं वक्तव्य रेड्डी यांनी केले.
देशात सुप्रीम कोर्टाची चार ठिकाणी बेंच निर्माण झाल्यास दिल्लीत असणाऱ्या मुख्य न्यायालय संविधानिक याचिकांवर पूर्ण क्षमेतेने लक्ष देऊ शकते. चार ठिकाणी स्थापन झालेल्या बेंच समोर राज्याराज्यातील हायकोर्टातून पुढे जाणाऱ्या याचिका जातील. यामुळे आर्थिक अडचणींमुळे सुप्रीम कोर्टात न जाऊ शकणाऱ्या व्यक्तींना लाभ होईल, असंही रेड्डी म्हणाले.पाच राज्याच्या बार काऊन्सिलचे प्रतिनिधी बेंचच्या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरन्यायाधीश शरद बोबडे यांची येत्या काही दिवसांमध्ये भेट घेणार आहेत.