दक्षिण आफ्रिकेत कोव्हीशील्ड निष्प्रभ ; १० लाख डोस माघारी पाठवणार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था | दक्षिण आफ्रिकेतील नवकोरोनावर निष्प्रभ ठरत असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे १० लाख डोस परत घ्यावेत, असे त्या देशाने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीला कळवले आहे.

 

फेब्रुवारीत लशीचे हे डोस पाठवण्यात आले होते.   मंगळवारी  जागतिक आरोग्य संघटनेने या लशीच्या आपत्कालीन वापरास जगातील देशांना परवानगी दिली आहे.

 

दक्षिण आफ्रिकेतील नवकोरोनावर कोविशिल्ड ही अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेली लस प्रभावी नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील या लशीच्या माध्यमातून केले जाणारे लसीकरण थांबवण्यात आले होते.

 

दरम्यान, नवकोरोनासाठी सध्याच्या लशीत काही बदल करण्याचे प्रयत्न अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ करीत आहे. या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने भारतात कोविशिल्ड म्हणून केली होती. या लशीचे १० लाख डोस दक्षिण आफ्रिकेला गेल्या आठवडय़ाच पाठवले होते. पुढील काही आठवडय़ात पाच लाख डोस येणे अपेक्षित होते. पण त्याआधीच दक्षिण आफ्रिकेने ही लस नाकारली आहे.

 

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते, की सरकार अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचे डोस विकण्याचे काम छोटय़ा स्वरूपातील नैदानिक चाचण्यानंतर करील. पण नंतर चाचण्यांमध्ये ही लस दक्षिण आफ्रिकेतील ‘५०१ वाय व्ही २ ’ या नवकोरोना विषाणूवर परिणामकारक नसल्याचे दिसून आले होते.

 

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने म्हटले आहे, की आमच्या लशीमुळे दक्षिण आफ्रिकेतील नव कोरोना विषाणूपासून फार कमी संरक्षण मिळत आहे, त्या माहितीचा अभ्यास दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरसँड व ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने केला आहे. दक्षिण आफ्रिकेत आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीने लसीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Protected Content