सावदा ता.रावेर प्रतिनिधी । थोरगव्हाण-दुसखेडा-भुसावळ रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. यामुळे नागरीकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत तर बर्याच दुचाकी व चारचाकी गाड्या खुळखुळा होवून रोज गॅरेज वारी करतअसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी या रस्त्याकडे कोणी लक्ष देईल का? अशी केवीलवाणी अवस्था या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची झाली आहे. याबाबत अधिक माहीती अशी कि तांदलवाडी गाते रणगाव तासखेडा गहुखेडा रायपुर सुतगाव थोरगव्हाण दुसखेडा यासह तब्बल डझनभर गावांचा सरळ संपर्क भुसावळ शहराशी या रस्ते द्वारे असल्याने हा रस्ता अतिशय दयनीय झाल्यामुळे शेतकऱ्यांना रुग्णांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांबरोबरच या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी पुरते वैतागले आहेत. या रस्त्यावर असंख्य छोटे मोठे खड्डे आहेत त्याच्या जोडीला पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरीही आहेत त्यामुळे हा रस्ता वहातूकीसाठी धोकादायक बनला आहे. .
वाहने जावून येथील साईड पट्टयांवरील मुरूम पुर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता एकार झाला आहे. तर काही ठिकाणी रस्ता अरूंद झाला असून अपघाताची शक्यता वाहनधारकांमधून बोलली जात आहे. दोन मोठी वाहने समोरा-समोर आल्यास रस्त्यावरून वाहनाचे एका बाजुचे चाक खाली उतरवावे लागत आहे त्यामुळे वाहन एका बाजूला पूर्णपणे झुकते. वाहनात जास्त बोजा असेल तर एकार रस्त्यामुळे वहान पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशीच परिस्थिती या मार्गावर ठिकठिकाणी आहे. या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की अनेक ठिकाणी हा रस्ता डांबरी होता असे म्हणले तर खरे वाटणार नाही. त्यामुळे हा रस्ता संबंधीत विभागाने पहाणी करून खडीकरण व डांबरीकरण करावा अशी मागणी या तापीपरीसरातील सर्व गावातून जोर धरत आहे.