थॅलॅसिमिया रुग्णांसाठी एचएलए तपासणी शिबीर

 

जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृति प्रतिष्ठानतर्फे व पेरेंट्स असोसिएशन ऑफ थॅलॅसिमिक यूनिट ट्रस्ट याच्या सहकार्याने थॅलेसिमिया रुग्णांसाठी एचएलए टेस्ट कॅम्प (बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबीर) रविवार दि .२९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

थॅलेसिमिया रुग्णांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सतत बाहेरून रक्त दिले जाते. नियमित रक्त दिल्यामुळे दुष्परिणाम दिसू लागतात. या आजारावर दिर्घायुष्यासाठी कोणतेही औषधी उपचार नसल्याने फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार १० ते १५ लाखात उपलब्ध आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ही एचएलए टेस्ट करणे अनिवार्य असते. सदर टेस्ट खर्चिक असल्यामुळे सर्व सामान्यांना पेलणे शक्य नसते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रथमच एचएलए टेस्ट कॅम्प (बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबीर) होत असल्याची माहिती या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉ. सई नेमाडे यांनी दिली.
या कॅम्पसाठी मुंबई येथील कोकिलबेन अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध ओंकोलोजिस्ट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शंतनू सेन व समुपदेशक ज्योती टंडन स्वतः उपस्थित रहाणार आहेत.

थॅलेसिमिया मुक्त समाज-
केशवस्मृति प्रतिष्ठान तर्फे थॅलेसिमिया मुक्त समाज हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पा अंतर्गत थॅलेसिमिया आजाराबाबत समाजात जनजागृती करणे, आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी व औषधी उपलब्ध करण्यासाठी व शैक्षणिक मदत करून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. तसेच या रुग्णांसाठी नियंत्रण, या रुग्णानांचे व्यवस्थापन व पुनर्वसन असे कार्य केले जाईल. तसेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी मदत उभी करणे असे कार्य केले जाईल.
थॅलेसिमिया गरजू रुग्णांनी एचएलए तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केशवस्मृति प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content