जळगाव प्रतिनिधी । त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे शहरातील कमल पॅराडाइज हॉटेल येथे “कॅसिनोरोयाल २०२०’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी डान्स, फॅशन शो, सिंगिंग यांसह विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत धमाल केली.
कार्यक्रमात मयूर चौधरी याला मिस्टर फार्मा तर कोमल पाटील हिला मिस फार्मा म्हणून पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे चेअरमन मनोज पाटील यांनी विजेत्यांचे कौतुक केले. त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या बॅचलर ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांसाठी “कॅसिनोरोयाल २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शहरातील इंडस्ट्रिअल ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख अनिल विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यासाठी थीम पार्टी आयोजित करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा वेशभूषा परिधान केल्या होत्या. यासोबतच विद्यार्थ्यांनी बाला बाला…., ओ लडकी आंख मारे… यांसह बहारदार अशा गीतांवर नृत्य सादर करत जल्लोष केला. तर एकापेक्षा एक अशी गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शो कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला जलवा दाखविला. सायंकाळी कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट फार्मास्युटिकलचे युनिट हेड प्रशांत सोनवणे, त्रिमूर्ती फार्मसीचे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा चौधरी यांनी केले तर निशा जाधव यांनी आभार मानले.