‘त्या’ वृध्देच्या अपघातप्रकरणी बसचालकावर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथे गावी जाण्यासाठी आलेल्या देवकाबाई नारायण सपकाळे (वय-७०) या वृध्देचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना नवीन बसस्थानकात आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसचालकाविरूध्द जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई बाप नारायण सपकाळे (वय-७०) रा. कानळदा ता.जि.जळगाव ह्या आपल्या सिंधूबाई मुरलीधर कोळी (वय-६५) रा. चुंचाळे ता. यावल आणि लिलाबाई व्यंकट सोनवणे (वय-६८) रा. लाडली पाळधी ता. धरणगाव या दोन बहिणीसोबत चाळीसगाव येथून जळगाव बसस्थानकात सकाळी ११ वाजता पोहचल्या.  लहान बहिण सिंधूबाई ह्या चिंचोली गावाला बसमधून निघून गेल्या. सोबत लिलाबाई सोनवणे आणि देवकाबाई सपकाळे ह्या बसस्थानकात थांबल्या. कानळदा येथे जाण्यासाठी देवकाबाई बसस्थानकाच्या आवारात जात असतांना भरधाव वेगाने  एमएच १४ : बीटी ५६४ क्रमांकाची मनमाड ते भुसावळ या बसने पुढच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याचे पाहून लिलाबाई यांना हंबरडा फोडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

लिलाबाई  सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बसचालक राजू गंगाराम अहिरे याच्या विरूध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे. 

 

Protected Content