जळगाव प्रतिनिधी । लेखा परिक्षण अहवाल चांगला करण्याच्या मोबदल्यात ३२ हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी जंगले यांना बुधवारी रात्री अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा. रामानंद नगर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार आणि इतर सहकारी यांनी यांच्या विविध पथसंस्थेच्या ऑडीटसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा.रामानंद नगर, जळगाव यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. दरम्यान, ऑडीटच्या छाणणीसाठी तक्रारदारांकडून ५२ हजार रूपयांची लाचेची मागणी ३१ जुलै रोजी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत रितसर तक्रार केली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचून लाचखोर जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी जंगले यांनी ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. पी.वाय.लाडेकर यांनी संशयित आरोपी जंगले याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकूर हे करीत आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले.