नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्याबरोबरच त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च आम्ही करणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलकांवर पोलिसांसमोरच गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून सत्कार केला जाणार आहे. या मुलाचा आम्हाला अभिमान आहे. त्याने जामियाच्या कॅम्पसमधील देशद्रोही कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारी आझादी देण्याचा प्रयत्न केला, असे मत हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी व्यक्त केले आहे. तर हा तरुण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्राभक्त आहे, असे हिंदू महासभेने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, शरजील इमाम आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे धक्कादायक वक्तव्य हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांनी केले आहे.