जळगाव प्रतिनिधी । एसटी बस मागे घेत असताना जोरात बस मागे घेतल्याने चार्जमन भिकन शंकर लिडाइत (वय-५७) यांचा विभागीय एसटी वर्कशाप मध्ये मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी बस चालक शशिकांत वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी दाखल करण्यात आला आहे.
अशी आहे घटना
शहरातील नेरी नाका स्मशानभूमिच्या पुढे असलेल्या एसटी वर्कशॉपमध्ये आज सकाळी अपघात घडला. वर्कशॉप चार्जमन म्हणून कार्यरत असणारे भीकन शंकर लिंडायत (वय ५७, एसटी कॉलनी) हे दुरूस्त झालेल्या एका बस (एमएच २० बीएल १२०३)ला हात मागे करून दिशानिर्देश देत होते. यातच मागे एक बस उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तर समोरच्या चालक शशीकांत वानखेडे यांनी गाडी जोरात रिव्हर्स घेतल्याने त्यांना धक्का लागला. आणि ते दोन्ही बसच्या मध्ये दबले गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १४ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, भिकन शंकर लिंडायत हे गेल्या दहा दिवसांपासून सुटीवर होते. सुट्टीनंतर ते पहिल्याच दिवशी ड्युटीवर रूजू झाले असतांना त्यांना मृत्यूने गाठले. यंदा ३१ डिसेंबरला ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्येने एसटी कॉलनीसह परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा जयेश लिडाइत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बसचालक शशिकांत वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतीलाल पवार करीत आहेत.