जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील असोदा येथे पाटील-वाणी विवाह सोहळ्यास गोदावरी समूहाचे अध्यक्ष आणि रावेर लोकसभेचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील गेले असता, तेथे अनेक स्नेही त्यांना भेटले. यात एक भेट ही अविस्मरणीय ठरली.
डॉ. उल्हास पाटील हे आसोदा येथे एका विवाह सोहळ्यात सहभगी होण्यासाठी गेले असता त्यांना सुखद अनुभव आला. या विवाह सोहळ्यात डॉ. पाटील यांच्या वडिलांचे म्हणजेच स्व. वासुदेव गुरुजींचे सख्खे मावस भाऊ आणि सखे बालमित्र गोविंदराव पाटील वय वर्ष ९४ यांची भेट झाली. डॉ. पाटील हे वयाच्या १० व्या वर्षापासूनच घरापासून दूर शिक्षणासाठी पुणे येथे वस्तीगृहात राहत होते. त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षीच वासुदेव गुरुजीचे १९७५ साली वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. डॉ.उल्हास पाटील यांना दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा सहवास लाभला नाही. त्यामुळे अतिशय भावनिक होऊन ते वडिलांबद्दल ऐकत होते. आज खान्देशात गोदावरी समुहा सारख्या मोठ्या समूहाला सक्षमपणे चालवणारे रावेर लोकसभेचे खासदार राहिलेले हे व्यक्तिमत्व भूतकाळातील त्यांच्या आठवणीत बालपणामध्ये रममाण झाले होते, हे दृश्य खूप भावनिक आणि बोलके होते.