मुंबई (वृत्तसंस्था) मृत्यू होतात तेव्हा नातेवाईकांना कळवण, मृतदेह अन्यत्र हलवणे, मॉर्गमध्ये जागेची व्यवस्था करणे व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी थोडा वेळ लागणारच. अशावेळी शेजारी असलेल्या रुग्णाला औषध देणे तसेच धीर देण्याचे काम एखादी परिचारिका व डॉक्टर करत असले तर ‘मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार’ अशा प्रकारचा व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा तर आहेच. पण त्याच्या आधारे जर विरोधक टीका करणार असतील तर ते त्याहून गंभीर गुन्हेगार आहेत, अशी कडवट टीका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मृतदेह काही दिवस पडून आहेत असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते तर शीव रुग्णालयात एका मृतदेहाशेजारच्या खाटेवर दुसरा रुग्ण असून परिचारिका तशाच परिस्थिती रुग्णावर उपचार करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही आक्षेप उपस्थित केले आहेत. याकडे लक्ष वेधून कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आपल सर्वस्व पणाला लावून रुग्णांवर उपचार करत असताना किमान वस्तुस्थिती समजून घेऊन नंतरच योग्य ती टीका करणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. काहीवेळा रुग्णवाहिका मिळायला वेळ लागतो. त्याचीही वेगवेगळी कारणे आहेत. कधी नातेवाईक क्वारंटाइन असतात आणि भीतीपोटी मृतदेह न्यायला शेजारी पाजारी येत नाहीत. मात्र कोणतीच वस्तुस्थिती समजून न घेता महापालिका रुग्णालयात स्वत: च्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर व पकिचारिकांसह संपूर्ण रुग्णलयालाच बदनाम करून वेठीला धरायचा हे कुठले राजकारण आहे?, असा सवालही राजेश टोपे यांनी विचारला आहे.