जळगाव, प्रतिनिधी । येथील उज्वल एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला तत्कालीन नगरपालिकेने दिलेला भूखंड नागरिकांना परत मिळावा अशी मागणी इ-मेलद्वारे माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मुख्यमंत्री, नगरविकास विभाग सचिव, विभागीय आयुक्त, जळगाव महापालिका आयुक्त यांना केली आहे.
आदर्श नगर येथील खुला भूखंड उज्वल एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला तत्कालीन जळगाव नगरपालिकेने अटी शर्ती नुसार करार करून देण्यात आला होता. या संस्थेने या अटी शर्तींचा भंग केल्याने तत्कालीन सहाय्यक संचालक, नगररचना अधिकारी संबंधित अभियंता ८१ ब ची नोटीस न बजावता साधी नोटीस बजावली होती. यामुळे संस्थेने न्यायालयात जाऊन स्टे (तात्पुर्ती स्थगिती ) मिळवली होती. जवळपास ४ वर्ष होऊन देखील हा स्टे उठविण्यात आलेला नाही. यात काहीतरी पाणी मुरत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केला आहे. इतर स्टे सहा ते १ वर्षात उठविला जात असतांना हा स्टे ४ वर्ष कसा ? असा प्रश्न श्री. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. मनपाच्या विधी, नगररचना विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी या केसकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप श्री. सोनवणे यांनी केला आहे. संस्था जर सर्व अटी शर्तींचा भंग करीत असेल तर चांगला वकील लाऊन हि जागा नागरिकांना परत द्यावी अशी मागणी श्री. सोनवणे यांनी इ-मेलद्वारे केली आहे. ही संस्था या जागेचा व्यावसायिक वापर करतांना दिसून येत आहे. याबाबतश्री. सोनवणे यांनी वारंवार आवाज उठविला आहे. ही जागा नागरिकांना परत दिल्यास समाजसेवा व समाजाच्या चांगल्या कामा करीता तिचा उपयोग होईल अशी अपेक्षा श्री. सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.