पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस असल्याची खोटी बतावणी करुन शहरातील एका सेवानिवृत्त वृद्धाच्या हातातील ३९ हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेवुन घटनास्थळा वरुन पोबारा केला. घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील सानेगुरुजी काॅलनीतील सेवानिवृत्त रहिवाशी भिवराव भाऊराव पाटील (वय – ७९) हे ३० जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकातील हार्डवेअर दुकानात उधारीचे पैसे देण्यासाठी त्यांच्या स्कुटीने गेले होते. दरम्यान १:३० वाजेच्या सुमारास खाजगी कामासाठी एम. एम. महाविद्यालयाच्या पाठीमागील दत्त काॅलनी परिसरातुन जात असतांनाच विनानंबर मोटरसायकलने दोन अनोळखी इसमानी भिवराव पाटील यांना थांबवुन आम्ही पोलिस आहोत. तुमच्या परिसरात फसवणुकीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत. आम्हाला साहेबांनी पेट्रोलिंगसाठी पाठविले आहे. अशी बतावणी करून त्यांचे जवळील लाल रंगाचा हात रुमाल काढत भिवराव पाटील यांच्या हाताच्या बोटात असलेल्या ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा दोन अंगठ्या रुमालात बांधण्याचे नाटक करत सदरील रुमाल भिवराव पाटील यांच्या कडे दिला. व घटना स्थळावरुन पोबारा केला. काही वेळानंतर भिवराव पाटील यांनी रुमाल बघितला असता दोन सोन्याच्या अंगठ्या आढळुन आल्या नाही. तेव्हा भिवराव पाटील यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. भिवराव पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. भिवराव पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. सुनिल पाटील हे करीत आहे.