भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्वांना लॉकडाऊनच्या काळात घरीच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या परीने या जागतिक संकटातून मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, यात डॉक्टर, मेडीकल, पोलीस, साफसफाई कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, शेतकरी, मिडीया, गॅस सिलेंडर विभाग मदतीसाठी तत्पर आहेच मात्र पेट्रोल डिझेल पंपावर काम करणारे कर्मचारी दुर्लक्षित झाला आहे. तेव्हा थोडं यांचेही कौतुक करा असे आवाहन ॲड.डॉ. नि.तू. पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
आधी पेट्रोल भरा, पैसे द्या, बिल घ्या आणि विषय संपला. पण आता त्यांचीदेखील जबाबदारी वाढली आहे. आता सर्वात आधी शासनाने जाहीर केलेले प्रमाणित नमुना(सोबत जोडला आहे) त्यांना जमा करून त्याची खात्री करून घ्यावी लागते. हे फॉर्म फक्त जे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहे,त्यांच्या साठी आहे. जेणे करून संचारबंदीचे पालन होईल, ह्या फॉर्मवर आपण कुठे काम करतो. नाव, हुद्दा, गाडी नंबर, किती प्रमाणात ऑइल भरणार आदी माहिती भरली जात आहे आणि विशेष म्हणजे आपण काम करत असलेल्या कार्यालयाचा शिक्का आणि कार्यालय प्रमुख सही, मोबाईल नंबर पण मी पाहत आहे की यातही नागरिक पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात, अरेरावी करतात, प्रसंगी शिव्या देतात, काही तर म्हणतात तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? मित्रहो, हा शासकीय आदेश आहे, सर्व फॉर्म जमा करून तहसील ऑफिस कडून त्यांचे तपासणी आणि फेरतपासणी होणार आहे,म्हणून एक फॉर्म हा सदर कार्यालयात जमा करून व्यवस्थित ठेवावा लागणार आहे, नंतर यासर्वांचे ऑडिट होणार आहे.
पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी वर्गाशी वाद विवाद करू नका, ते पण आपलेच बांधव आहेत, ते पण रोज सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ७ ह्या वेळेत सेवा देत आहेत, ते पण आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, त्यांना पण परिवार आहे,तेव्हा त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलता येत नसतील तर चालेल पण कृपया हुज्जत घालू नका, तेव्हा थोडं यांचेही कौतूक करा ….!! असे आवाहन ॲड.डॉ. नि.तू. पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.