कोलकाता वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार तमनश घोष यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. घोष यांच्या निधनाने पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
तमनश घोष हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फालता विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोलकत्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शारीरिक गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
“अत्यंत अत्यंत दु:खद. तमनश घोष हे फालता मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. १९९८ पासून ते पक्षाचे कोषाध्यक्ष राहिले होते. त्यांचा निरोप घेताना निरतिशय दु:ख होत आहे. तमोनश घोष ३५ वर्षांहून अधिक काळ आमच्यासोबत होते. जनता आणि पक्षासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी सामाजिक कार्य करुन मोठे योगदान दिले.” अशा भावना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या.