भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन कृषी विभाग व उमेद अभियान पं स भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी श्रीराम मंगल कार्यालय कोठली रोड भडगाव येथे महिला कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेश दादा पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर उपस्थित होते.आपले मार्गदर्शनात कृषी अधिकारी ठाकूर यांनी उपस्थित महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना ३५ टक्के प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त १० लक्ष रुपयांपर्यंत लाभ घेता येईल असे सांगितले, तसेच सदर योजनेचे ऑनलाइन अर्ज करणे, प्रकल्प आराखडा तयार करणे व कर्ज मंजुरी पर्यंत मार्गदर्शनासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती यांची नियुक्ती कृषी विभागामार्फत करण्यात आलेली असून त्यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त महिलांनी उद्योजक होऊन आत्मनिर्भर होण्याचे प्रतिपादन केले.
महिला बचत गटांनी वैयक्तिक महिलांनी पुढे येऊन छोटे छोटे उद्योग उभे करण्याचे आवाहन केले त्यात मोड आलेले कडधान्य पॅकिंग, सोडलेले लसूण पॅकिंग, मुरमुरा उद्योग, खारे शेंगदाणे वाटाणे उद्योग, मका पॉप कॉर्न, मुरंबा उद्योग, चिप्स व वेफर्स उद्योग, कढीपत्ता -मेथी- कोथिंबीर सोलर ड्रायर द्वारे वाळवून पॅकिंग करणे, खारवलेले नट्स, मसाला उद्योगात काळा मसाला, पनीर मसाला, मटन मसाला, वडापाव मसाला यासारखे मसाले, इन्स्टंट पीठ, चिक्की व राजगिरा लाडू, कुरड्या, पापड्या, वडे, विविध चटण्या त्यात कारळ चटणी, कढीपत्ता चटणी, वडापाव चटणी, जवस चटणी , विविध प्रकारचे लोणचे त्यात लिंबू लोणचे, कैरी लोणचे, मिरची लोणचे, गाजर लोणचे, बीट लोणचे, कारले लोणचे ,आवळा लोणचे ,आवळा कॅन्डी उद्योग, कैरी पन्हा उद्योग, मारमालेड, जाम, जेली, कोकम व आमसूल उद्योग यासारखे छोटे-मोठे उद्योग उभे करून महिलांनी शासनाच्या मदतीने उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करणे बाबत आवाहन केले.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात जिल्हा आत्मनिर्भर महिला अभियान ८ ते ११ मार्च या कालावधीत सुरू असून अभियानांतर्गत महालॅब अंतर्गत ५००० किमतीच्या महागडी रक्त तपासण्या मोफत उपलब्ध असून महिलांनी लाभ घेणे बाबत आवाहन केले त्याचबरोबर आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य – कार्ड नोंदणी तसेच वितरण प्रक्रिया, महिला उद्योजकांसाठी कर्ज प्रक्रिया, ई-श्रम कार्ड यासारख्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांची उपस्थित महिलांना सविस्तर माहिती देऊन महिलांनी उद्योजक होवून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणे बाबतचे प्रतिपादन केले. तसेच शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असून मदतीसाठी तत्पर असलेबाबत आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत नियुक्त जिल्हा संसाधन व्यक्ती प्रवीण पाटील यांनी उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, शॉप ॲक्ट परवानासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत वैयक्तिक व गट लाभार्थी तसेच सामायिक पायाभूत सुविधा , मार्केटिंग व ब्रँडिंग चे प्रस्ताव सादर करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर ठिकाणी अर्ज नोंदणी करणे बाबतचे उपस्थित महिलांना आवाहन केले.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी उपस्थित महिलांना पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नागली, भगर, राळा, राजगिरा यांचे आरोग्य विषयक गुणधर्म याविषयी सखोल मार्गदर्शन करून महिला व लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस पौष्टिक तृणधान्यांचे सेवन करणे बाबत आवाहन केले. सदर कार्यक्रमात अमोल नाना पाटील, अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून महाराष्ट्र शासन कृषी विभागासह शासनाच्या विविध विभागांकडून जनजागृती सुरू आहे.आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष साजरे करताना ज्वारी, बाजरी , नाचणी,वरई, राळा,राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन वाढविणे त्यांचे आरोग्य विषयक फायदे विषयी जनजागृती निर्माण करणे, लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे तसेच मूल्यवर्धन करून पाककृतींचा विकास करणे असे उद्देश समोर ठेवून विविध जनजागृती पर कार्यक्रम घेतले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभागामार्फत श्रीराम मंगल कार्यालय कोठली रोड भडगाव येथे पौष्टीक तृणधान्यांच्या पाककृतींचा विकास होऊन मूल्यवर्धन व्हावे यासाठी तालुकास्तरीय मिलेट सुगरण पाककला स्पर्धा माननीय खासदार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सदर पाककला स्पर्धेत उमेद अंतर्गत नोंदणी ग्रुप व वैयक्तिक महिलांचा सहभाग घेण्यात आला, या स्पर्धेत ज्वारी, बाजरी, नागली, भगर, राळा व राजगिरा यापासूनच विविध पदार्थ घरूनच बनवून आणणे, पदार्थाचे नाव, घटक पदार्थ, पौष्टिकतेचे फायदे, आरोग्य विषयक गुणधर्म व पाककृती पद्धत पदार्थासोबत प्रदर्शनात ठेवण्याची अट ठेवण्यात आलेली होती त्यानुसार विविध महिला व बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धेत श्रीमती वैशाली राजेश पाटील भडगाव यांना बाहुबली थाळी साठी प्रथम क्रमांक, रिद्धी सिद्धी स्वयंसहायता गट पिंप्रीहाट यांना राळ्याचा व्हेज पुलावासाठी द्वितीय क्रमांक, श्रीमती सुरेखा विकास पाटील, महिंदळे यांना भगरीचे कोंडाळे व नागलीचा शिरा यासाठी तृतीय क्रमांक त्याचबरोबर मनीषा पाटील, वाक, दिपाली महाजन, शिंदी, माऊली कृपा बचत गट, वलवाडी यांना उत्तेजनार्थ बक्षीस अंतर्गत प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य आरोग्य विषयक महत्त्व सांगणाऱ्या जनजागृती स्टँडी पोस्टर्सचे प्रदर्शन व प्रत्यक्ष नमुने ठेवण्यात आलेले होते त्याचबरोबर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याच्या घडी पत्रिका व माहितीपत्रके यांचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह निमित्त योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या महिलांना चेकचे वितरण स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर विलास बिंदोड, खासदार उन्मेश दादा पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड साहेब, गटविकास अधिकारी रमेश वाघ, तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार मोतीराय, सोमनाथ भाऊ पाटील, रेखाताई पाटील, नूतनताई पाटील, मनीषा ताई पाटील,मंडळ कृषी अधिकारी भडगाव,उत्तम जाधव, मंडळ कृषी अधिकारी कजगाव, अनिल तायडे इत्यादी सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेद अभियानाचे प्रशांत महाले यांनी तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी गोर्डे यांनी केले.