नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन वगळता उर्वरित जमीन ही राम जन्मभूमि समितीला देण्याची मागणी आज केंद्र सरकारने न्यायालयात केली आहे.
केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणी नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यात केंद्राने अयोध्येतील २.७७ एकरची वादग्रस्त जागा वगळता उर्वरित ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा व राम लल्ला यांना सारख्या प्रमाणात वाटून देण्याचा निकाल २०१० मध्ये दिला होता. त्यावर १४ अपिले प्रलंबित आहेत. एकूण चार दिवाणी दाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जमीन सारखी वाटण्याचा निकाल दिला होता. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमिवर, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात नवीन अर्ज सादर केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.