जळगाव प्रतिनिधी । आपण आणि आपली पत्नी ही राजकारणात कार्यरत असल्यामुळे आपल्या क्रीडा व सांस्कृतीक मंडळावर राजकीय आकसातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप आज धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, ते योगेश्वर क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धरणगावचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या संस्थेचे जळगाव येथील चित्र चौकातील मनीष प्लाझा येथे भाडेतत्वावर कार्यालय आहे. या कार्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंधा यांनी या कार्यलयात २७ जुलै रोजी रात्री दिड वाजता संस्थेत ते स्वतः, त्यांचे सहकारी व सभासद झोपलेले असताना संस्थेच्या कार्यालयाच्या जिन्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून जिन्याने वर येत झोपलेल्यांना शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी कुमार चिंधा यांनी पैसे किधर है असे दरडावून विचारत असतांना श्री. महाजन यांच्या कानावर हाताने जोराने मारले असता त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे. यावेळी इतर पाच जणांना देखील मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असताना ती करण्यात आली नाही. कुमार चिंधा यांनी खोटा पंचनामा करून झन्ना मन्ना हा खेळला जात असल्याचा आरोप केला तो चुकीचा असून चिंधा यांनी पैशाच्या हव्यासापोटी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले. त्यांचे चारचाकी वाहन हे दुसऱ्या गल्लीत असताना देखील गुन्ह्यात दाखविण्यात आली आहे. या वाहनात ठेवलेले २ लाख रुपये काढून घेण्यात आल्याचा आरोप श्री. महाजन यांनी केला असून कुमार चिंधा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/401702421528850