बीजिंग : वृत्तसंस्था । चीनने तिबेटियन कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सैनिक बनणे बंधनकारक केले आहे. हे सैनिक पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये भरती होतील चीन या तिबेटियन सैनिकांचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या विरोधात वापर करेल.
पूर्व लडाखमध्ये एलएसीवर चीनकडून सातत्याने नवीन योजना आखल्या जात आहेत. चीनने तरुण तिबेटींना पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. तिबेटी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे आणि सीमेवर मार्गदर्शक म्हणून काम करावे, अशी चीनची इच्छा आहे. चीनचे लष्कर बळकट करणे आणि त्याचे एअरबेस अपग्रेड करण्याचे काम सतत सुरु आहे. चीन आता जबरदस्तीने तिबेटियन लोकांना सैनिक बनवण्यासाठी उतावळा झाला आहे.
या तिबेटियन युवकांना निष्ठा चाचणीतून जावे लागत आहे. या तिबेटियन सैनिकांना विशेषत: भारतासह लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन तैनात करेल.
चीन या तिबेटियन तरुणांची निष्ठा चाचणी घेत आहे आणि नंतर त्यांना कठोर प्रशिक्षण देत आहे चीन ज्या तिबेटींना आपल्या सैन्यात भरती करत आहे, ते सर्व चीनमध्ये राहतात. चिनी सैन्य तिबेटियन युवकांची भरती करत असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे आणि एलएसीवर विशेष ऑपरेशनची तयारीही सुरू आहे, असे माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
तिबेटियन सैनिकांना भरती दरम्यान विविध प्रकारच्या चाचण्यांमधून जावे लागत आहे. या अंतर्गत, सैनिकांना चिनी भाषा शिकण्यास सांगितले जात आहे, चीनचा कम्युनिस्ट पक्ष सर्वोच्च असल्याचे त्यांना सांगितले जात आहे.