चाळीसगाव प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात शुक्रवार रोजी रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आला आहे. परिणामी शहरातील पुलासह विविध भागातून पाणी वाहू लागल्याने महिन्याभरात सहाव्यांदा पूरस्थितीला चाळीसगावकरांना सामोरे जावे लागले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अचानक ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. या ढगफुटीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अनेकांचे जनावरे व घरे वाहून गेल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली. दरम्यान ही झळ अद्यापपर्यंत पूरग्रस्तांना सोसावे लागत असतानाच शुक्रवार रोजी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तितूर व डोंगरी नदीच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक जणांच्या घरात पाणी घुसले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मुसळधार पावसामुळे तितूर व डोंगरी नदींसह परिसरातील छोट्या मोठ्या नाल्यांना पुर आले आहेत. विशेष बाब म्हणजे एकाच महिन्यात तितूर व डोंगरी नद्यांना सहाव्यांदा पुर आलेला आहेत. शहरातील घाट रोडवरील मुख्य पूल असलेल्या पूलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. मात्र यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याचे दिसून आलेले नाही. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिन्याभरात चाळीसगाव शहरासह तालुक्याला एकूण सहा वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांना याचा फटका जबर बसला आहे.