मुंबई : वृत्तसंस्था । सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले 41 तालुके निवडून त्या प्रत्येक तालुक्यात 100 विद्यार्थी क्षमता असलेली मुला-मुलींसाठी मिळून दोन वसतिगृहे अशी एकूण 82 वसतिगृहं उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन अशा सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ऊसतोड कामगारांची जास्त संख्या असलेले १० तालुके निवडून त्यामध्ये मुला-मुलींसाठी २ अशी एकूण २० वसतिगृहं उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी, केज, पाटोदा, गेवराई, माजलगाव, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.
उद्योग निरीक्षक (गट- क) संवर्गाची नामनिर्देशाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.