जळगाव प्रतिनिधी । तांबापुरातील भीलवाडी परीसरात बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात डीजे वाजविल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहे. दगडफेकीत डीजे गाडच्या काचा फोडून प्रचंड नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, भीलवाडीतील माधव गायकवाड यांची मुलगी मनीषा गायकवाड हिचे लग्न याच परिसरातील मोरे कुटुंबीयातील युवकाशी गुरुवारी होणार आहे. यामुळे बुधवारी रात्री एकलव्य चौकात हळदीच्या कार्यक्रमासाठी डीजे बोलावण्यात आला होता. डीजेवर वाजवलेल्या एका गाण्यावरुन वाद झाला. त्यानंतर अचानक डीजेच्या दिशेने जोरात दगडफेक सुरू झाली. तसेच दाेन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. काही महिलांनाही दगडाचा मार लागल्याने त्या जखमी झाल्या. दगडफेकीत राऊडी साऊंड या डीजे गाडीच्या (क्रमांक एमएच-०६, एज-२०३०) काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. यात युवराज ठाकूर (वय ३४), सोनू जाधव (वय १३), राजू दीपक गायकवाड, राकेश बोरसे यांच्यासह इतर एक असे पाच जण जखमी झाले. युवराज ठाकूर यास डोक्यास गंभीर मार लागला तो काहीवेळ रक्तभंबाळ अवस्थेत रस्त्यातच पडून होता. त्याची प्रकृती गंभीर आहे. सोनू जाधव यासही डोक्याला मार लागला असून दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लग्नाच्या घरातील सर्व वऱ्हाडी गायब
मनीषा गायकवाड या तरुणीचा गुरुवारी विवाह होणार आहे; मात्र हळद लागल्यानंतर लगेच दंगल उसळल्याने सर्वच नातेवाइक भीतीपोटी पळून गेले. घटनेनंतर लग्न घरात नवरीसह फक्त तीनच महिला उपस्थित होत्या. या घटनेचा नवरी-नरवदेव यांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला अाहे. तसेच दाेघांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.